Ticker

6/recent/ticker-posts

स्ट्रेचमार्क्स कसे कमी करावे? स्ट्रेचमार्क्सवर घरगुती आणि इतर उपाय

स्ट्रेचमार्क्स

स्ट्रेचमार्क्स कसे कमी करावे? स्ट्रेचमार्क्सवर घरगुती आणि इतर उपाय

स्वप्रतिमेची जाणीव ही मानवामध्ये आदिम युगापासूनच दिसून येते. समाजातील तरुणवर्ग आणि सर्व वयातील महिला याबाबत अतिशय संवेदनशील असतात. स्वप्रतिमेमध्ये स्वतःच्या बाह्यरूपाबाबतची जाणीव जरा जास्तच असते. त्यामुळे आपला चेहरा, बांधा, नाक- -डोळे, शरीरातील इतर अवयवांची समानता आणि आकर्षकपणा या बाबत काही अनाकर्षक किंवा विद्रूप वाटेल, एखादं व्यंग असेल, तर ते कसं दूर करता येईल, या बाबत या वर्गात कमालीची सतर्कता असते. 

यात काही जन्मजात व्यंग असतात, काही विशिष्ट आजारांमुळे होतात आणि काही बदलत्या शारीरिक परिस्थितीमुळे होत असतात. यापैकी प्रत्येक गोष्टींवर इलाज करायलाच पाहिजे असंही नसतं; पण स्वप्रतिमेच्या आधुनिक कल्पनांमध्ये शरीरावर उमटलेली एखादी अनाहूत रेघही दूषण समजली जाते.

स्ट्रेचमार्क्स म्हणजे काय?

स्वप्रतिमेच्या आड येणाऱ्या वैगुण्यांमध्ये त्वचा सतत ताणली गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या रेषा म्हणजेच स्ट्रेचमार्क्सचाही समावेश होतो. तसं पाहिलं, तर हा आजार नसतो. आपल्या त्वचेखाली कोलॅजेन आणि इलॅस्टिन नावाचे तंतुमय घटक असतात. या घटकांमुळे शारीरिक हालचालींमध्ये त्वचा आवश्यकतेनुसार ताणली जाते; पण कोणत्याही कारणामुळे त्वचा सतत ताणली जात राहिली, तर हे घटक नष्ट होऊन त्वचेखाली एक प्रकारची इजा होते. व्रण त्वचेवर उमटतात त्यांना स्ट्रेचमार्क्स म्हणतात.

त्वचा ताणली जाण्याची कारणं

गरोदरावस्था : स्त्रियांमध्ये गरोदरपणात पोटातील गर्भाच्या वाढीमुळे पोटाचा आकार वाढत जातो. पोटाची त्वचा सातत्यानं ताणली जात राहून, साधारणतः सहाव्या-सातव्या महिन्यांत पोटावर दोन्ही बाजूनं उभ्या रेघा उमटतात. किंचित गुलाबी किंवा पिवळसर पांढऱ्या दिसणाऱ्या या रेषांना वैद्यकीय परिभाषेत 'स्ट्राए ग्राव्हिडेरम्' म्हणतात. प्रसूतीनंतर  पोटाचा आकार कमी झाल्यावर त्या जास्त प्रकर्षानं जाणवतात. दहातील नऊ स्त्रियांमध्ये प्रसूतीदरम्यान असे स्ट्रेचमार्क्स निर्माण होतात. पोटाप्रमाणे स्तनांवर आणि नितंबांवरही असे स्ट्रेचमार्क्स निर्माण होतात.

वजनवाढ : काही कारणांनी काही व्यक्तींत अचानक वजनवाढ होते. अशा वेळेस दंड, पोट, मांड्या, नितंब या भागांत ताणरेषा उमटतात. त्याचप्रमाणे वेगानं वजन कमी करण्यानंही स्ट्रेचमार्क्स तयार होतात.

व्यायाम : नियमित शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या सांध्यांच्या कोपऱ्यात स्ट्रेचमार्क्स दिसून येतात. जोर, पुशअप्स, डिप्स, पुलअप्स मारणाऱ्या व्यायामपटूंच्या खांद्यावर आणि काखेशेजारी; बैठका, सायकलिंग, जॉगिंग, धावणं असा व्यायाम करणाऱ्यांच्या गुडघ्यांवर आणि त्या बाजूला स्ट्रेचमार्क्स दिसून येतात.

मलम : काही व्यक्ती त्वचेच्या विकारांसाठी स्टीरॉइड्सयुक्त मलमं वापरतात. त्यांची त्या भागातील त्वचा पातळ होऊन अशा रेषा उमटतात.

हॉर्मोन्स : काही विशिष्ट संप्रेरकांच्या परिणामांमुळे स्ट्रेचमार्क्स उमटतात.

जीवनसत्त्व : 'अ' जीवनसत्त्व जास्त प्रमाणात घेतल्यास, 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास स्ट्रेचमार्क्स उद्भवण्याची शक्यता जास्त असते. सगळे स्टेचमार्क्स एकसारखे दिसतातच असं नाही. ते निर्माण होण्याच्या कालावधीनुसार, त्वचेच्या प्रकारानुसार भिन्न असतात. त्यांचं वर्णन करायचं झालं, तर त्वचेवर लाटा,पसराव्यात अशा दिसणाऱ्या, वचेच्याच रंगाच्या; पण स्पर्श केल्यावर हाताला कडक लागणाऱ्या, त्वचेच्या आत जाऊन पुन्हा वर येणाऱ्या रेषा, त्यांचा रंग त्वचेनुसार गुलाबी, लाल, जांभळा, निळा किंवा काळा असतो. या रेषा थोड्या फिकट रंगाच्या असतात आणि हलकेच त्वचेच्या रंगात विलीन होतात. शरीरावर या रेघा कधी अगदी थोड्या भागावर असतात, तर काही वेळेस लांबलचक असू शकतात.

स्ट्रेचमार्क्सवर उपाय काय आहे?

स्ट्रेचमार्क्स हा आजार नसल्यानं त्याला औषधोपचाराची गरज नसते. क्वचितप्रसंगी त्यांच्या पृष्ठभागावर खाज सुटल्यास मॉयश्चरायझिंग मलमं डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरावी लागतील. बरेचसे स्ट्रेचमार्क्स उपचार न करताही कालांतरानं अस्पष्ट होतात. त्यांच्यावर उपचार केले, तर ते बऱ्यापैकी दिसेनासे होतात; पण पूर्णपणे कधीच नष्ट होत नाहीत.

काही व्यावसायिकांमध्ये विशेषतः सिनेकलावंत, मॉडेल्स आणि स्वप्रतिमेला अतिशय जपणाऱ्या इतर व्यक्तींना स्ट्रेचमार्क्स नाहीसे करण्याची इच्छा असते. अशांना उपचार म्हणून..

मलमं: अ जीवनसत्त्वापासून बनलेले ट्रेटिनॉइन क्रीम स्ट्रेचमार्क्स दूर करू शकतात. त्वचेखाली असलेला कोलॅजेन हा तंतूमय घटक खराब होऊन स्ट्रेचमार्क निर्माण होतात. ट्रेटिनॉइन क्रीममुळे कोलॅजेन पुन्हा निर्माण होऊ शकतं. मात्र, याचा वापर या रेषा उमटू लागण्याच्या सुरुवातीच्या काळात केल्यास जास्त चांगले परिणाम दिसून येतात. याशिवाय अ जीवनसत्त्वाचं मलम, ॲलो व्हेरा (कोरफड) क्रीम, हायल्युरॉनिक अॅसिड असलेलं मलम वापरलं जातं.

लेझर: पल्स्ड डाय लेझर थेरपी या क्षेत्रातील प्रमाणित आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरुवातीच्या काळात वापरल्यास त्वचेखालील कोलॅजेनची पुनर्निर्मिती होऊन मार्क्स अदृश्य होतात. याबरोबर एक्सायमर लेझर वापरून स्ट्रेचमार्क्सवरील त्वचेचा रंग बाजूच्या त्वचेशी सुसंगत करता येतो.

फंक्शनल फोटो थर्मोलायसिस: या लाइट थेरपीनंही कोलॅजेन निर्मिती होऊन स्ट्रेचमार्क्स दूर होतात.

मायक्रोडर्माब्रेशन, मायक्रोनीडलिंग : या कॉस्मेटिक पद्धतीच्या उपचारानं स्ट्रेचमार्क घालवता येतात.

घरगुती उपचार : काही पदार्थ नियमितपणे स्ट्रेचमार्क्सवर चोळले, तर ते फिकट होत जाऊ शकतात. यामध्ये साखर, खोबरेल तेल, लिंबाचा रस, खाण्याचा सोडा, ट्री टी ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कोको बटर, हळद, जोजोबा ऑइल, अॅपल सायडर व्हिनेगार, कॉफी पावडर अशा गोष्टी येतात. मात्र, यांच्या परिणामांची खात्री देता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या