Ticker

6/recent/ticker-posts

माजी जंगल सफारी आणि कृष्णवर्णीय सम्राट यांचे दर्शन

माजी जंगल सफारी आणि कृष्णवर्णीय सम्राट यांचे दर्शन

नीलगिरी आणि सागवानाच्या झाडांचा विपुल संख्येनं भरलेला जणू मेळावाच. स्वतः अंधाराची शाल लपेटून पर्यटकांना थंडीची प्रचिती देणाऱ्या काबिनीच्या गूढ, रहस्यमयी जंगलात मी 'इम्प्रेशनस फोटोग्राफी वर्कशॉप्स आणि एक्सपिडिशन' या संस्थेतर्फे वाइल्डलाइफ फोटोग्राफी टूर घेऊन आलो होतो. दक्षिण कर्नाटकातील अंधाऱ्या आणि शीतल अशा पहाटेच्या शांततेला भेदत रानातील माती तुडवत जाणाऱ्या आमच्या गाडीच्या आवाजाला रानकिडे गुणगुणत साथ करत होते. हवेच्या थंड झोतातून वाट कापत असताना मी त्या चकाकणाऱ्या हिरव्या दोन डोळ्यांच्या शोधात होतो. सकाळच्या धुक्यातून प्रवास करत गाडी एका अज्ञात प्रदेशात प्रवेश करत होती.

कृष्णवर्णीय सम्राट कोण आहे?

सूर्यकिरणं अंधारातून मार्ग काढत असताना आमच्या लक्षात आलं, की जंगलाचा 'कृष्णवर्णीय सम्राट' म्हणून जो ओळखला जातो, त्याच्या प्रदेशात आम्ही प्रवेश केला आहे. तोच तो...काळा बिबट्या ! हा बिबट्याच्याच जमातीतला असून, जनुकीय गुणधर्मांमुळे त्याच्या अंगावर काळ्या रंगाची त्वचा, लव आढळून येते. काळ्या बिबट्याची ही जमात मुख्यतः दक्षिण आणि आग्नेय आशियातील घनदाट अशा उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळून येते. अधिक प्रमाणातल्या मेलॅनिनमुळे असलेला त्यांचा काळा रंग त्याला आजूबाजूच्या परिसरात अलगदपणे मिसळून जाण्यास मदत करतो. 

गर्द काळोख्या अशा वनात त्याला त्याच्या या गुणधर्माचा शिकारीसाठी, सावज बेसावधपणे पकडण्यासाठी खूप फायदा होतो. आम्ही जंगलाच्या पुढच्या भागात जाण्याचा निर्णय घेतला. त्या भागात प्रवेश केला तसा आम्हाला भेकराच्या ओरडण्याचा आवाज आला. ती धोक्याची सूचना होती. ड्रायव्हरनं आम्हाला तत्क्षणी सांगितलं, की हा इथल्या वाघिणीच्या उपस्थितीचा संकेत आहे, जी काबिनीवर गेल्या पाच वर्षांपासून सत्ता गाजवत आहे. त्या संकेतांचा मागोवा घेत आम्ही पाऊण तास तिथं तळ ठोकून बसलो; पण इथंही आम्हाला हाती काही लागलं नाही.

आमची जीप सोडून तिथं दुसरी कुठलीच जीप नव्हती. काही तरी चुकल्यासारखं वाटत होतं. मनात चलबिचल वाढत होती. काही क्षण मनाची बांधणी करून आम्ही परत काळ्या बिबट्याचं वास्तव्य असलेल्या प्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिथं प्रवेश करतो न करतो तोच आम्हाला तिथं अनेक जीप एकत्र एके ठिकाणी जमलेल्या दिसल्या. आम्ही परत एकदा त्या काळ्या सौंदर्याची उपस्थिती अनुभवण्याची संधी गमावली होती. निराशेनं आम्हाला आता पूर्णतः घेरलं होतं. त्यातच भर म्हणजे, जो पट्टा आम्ही बराच वेळ वाट पाहून सोडला होता, त्या पट्ट्यातील वाघिणीनं झुडुपातून बाहेर पडून पाणसाठ्याजवळ आपली हजेरी लावली होती. 

काळ्या बिबट्याच्या दर्शनासाठी थांबायचा आम्ही निर्णय घेतला. शेवटचा अर्धा तास उरला होता. इंग्रजीत एक म्हण आहे, एक्स्पेक्ट द अनएक्स्पेटेड इन द जंगल, यावर विश्वास ठेऊन आम्ही थांबलो. काही वेळ थांबल्या नंतर आणि फोटो काढल्या नंतर काळा बिबट्या तो जंगलामधे निघून गेला. आणि तेथून आम्ही आमच्या सफारी वर निघालो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या